
लातूर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत नगरसेवक तथा सिनेट सदस्य ॲड. निखिल कासनाळे यांच्या वतीने मरशिवणी येथे भव्य मोफत आरोग्य, नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील सुमारे २०० नागरिकांनी या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंदजी रायबोले यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर होते.
यावेळी बोलताना अरविंद रायबोले यांनी “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना आवाज दिला. त्यांचा संघर्ष, सामाजिक समतेचा विचार आणि माणुसकीचा संदेश आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेसारखा सामाजिक उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चंद्रकांत कदम, श्री. अंगदराव दोडे, श्री. रामकिशन आमुगे, श्री. संजय गुणाले, श्री. किशन हाणमंते, श्री. अशोकराव लामतुरे, श्री. बाबुराव गोरे, श्री. बाबुराव पांचाळ, श्री. मधुकर श्रीरामे व श्री. शंकर गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळा, मरशिवणी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नेत्र तपासणीसाठी उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाची टीम, तर आरोग्य तपासणीसाठी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, अहमदपूर येथील वैद्यकीय पथक उपस्थित होते. नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रुग्णांची नोंद करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी हनुमंत दोडे यांनी उपस्थित मान्यवर, वैद्यकीय पथक, नागरिक आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ गवळी, उपाध्यक्ष ओम कांबळे, सचिव ओंकार वाघमारे, सहसचिव शिवम शिंदे तसेच भारत राजपंगे, देवीचंद राजपंगे, अविनाश राजपंगे, प्रकाश गवाले, इरबा गवळी, गजानन गवाले, पुंडलिक गवळी, संतोष गवळी, देवराज गवळी, अविनाश मोरे, माधव लामतुरे, बळीराम गवळी, केशव गवळी, श्रावण शिंदे, मंगेश गवळी, अतुल हानमंते, लखन लामतुरे, आशिष लामतुरे, सुनील लामतुरे, अन्तेश्वर लामतुरे, सुरज गवळी, बालाजी वाघमारे, बाबुराव वाघमारे, दत्ता राजपंगे, राजू शिंदे, राम राजपंगे आदींनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis