
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
बीड, १ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून उपोषणास बसले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी त्यांना वारंवार उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक बाब असल्याचे मत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात खासदार सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची गंभीरता तसेच मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, असे खासदार सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी तातडीने संवाद साधावा आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस व सकारात्मक निर्णय घेऊन त्यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी त्यांनी केली.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला आपला ठाम पाठिंबा असल्याचेही खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी आपण सदैव समाजाच्या सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis