चंद्रपूर : आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; डाळ-भाजीमध्ये आढळली पाल
जिवती तालुक्यातील नगराळा येथील घटना सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर चंद्रपूर, १ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादाय
प्रतिकात्मक


जिवती तालुक्यातील नगराळा येथील घटना

सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर

चंद्रपूर, १ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिल्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. दरम्यान, डाळ-भाजीमध्ये पाल आढळल्याने या घटनेने खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

नगराळा येथील ही आश्रमशाळा इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अखत्यारित आहे. नेहमीच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्यात आले. जेवण केल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊ लागला. विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे दिसून आल्याने शाळा प्रशासनाची धावपळ उडाली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने बाधित विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व ३१ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नातूनच विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डाळ-भाजीमध्ये पाल आढळल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, शाळा प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी कर्मचारी आणि संस्थाचालकांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी संतप्त पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणीही जोर धरत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande