चिराग पासवान यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली , 01 सप्टेंबर (हिं.स.)।केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या पत्रातून त्यांची लवकरच हत्या केली जाईल, असा इशारा देण्यात आला
चिराग पासवान यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी


नवी दिल्ली , 01 सप्टेंबर (हिं.स.)।केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या पत्रातून त्यांची लवकरच हत्या केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पत्रात लिहिले आहे, ‘तुम्हाला लवकरच कट्टर दहशतवाद्यांकडून मारले जाईल.’ धमकी समोर आल्यानंतर हा प्रकार सुरक्षा यंत्रणांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

चिराग पासवान यांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या पत्रात थेट त्यांच्या हत्येचा इशारा देण्यात आला आहे. पत्र पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, त्यांची लवकरच कट्टर दहशतवाद्यांच्या हातून हत्या केली जाईल. मात्र, हे पत्र नेमक्या कोणत्या व्यक्तीने किंवा संघटनेने पाठवले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पत्रातील धमकीची गंभीरता आणि तिची सत्यता तपासली जात आहे.

धमकी मिळताच चिराग पासवान यांच्या कार्यालयाने केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देण्याची तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. चिराग पासवान हे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेशी संबंधित या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सुरक्षा यंत्रणा या पत्रासह त्याच्याशी संबंधित इतर पुराव्यांचीही तपासणी करू शकतात.

सध्या धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख समोर आलेली नाही. हे पत्र नेमके कुठून टपालाद्वारे पाठवण्यात आले आणि त्याचा यापूर्वी ओळख पटलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेशी संबंध आहे का, हेही स्पष्ट झालेले नाही. सुरक्षा यंत्रणा पत्रातील मजकूर आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी करून ही धमकी किती गंभीर आहे आणि त्यामागे कोणाचा हात असू शकतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील.

चिराग पासवान यांना अशा प्रकारची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. जुलै २०२५ मध्येही त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ही धमकी समोर आली होती. ही धमकी एका इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)च्या प्रवक्त्यांनी पाटणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande