राहुल गांधींचा बुधवारी नाशिक दौरा; काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिराचा समारोप
नाशिक, १ सप्टेंबर (हिं.स.) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी बुधवारी, २ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राज्यस्तरीय निवासी शिबिराचा समारोप होणार आहे. गंगापूर धरणालगतच्या एमटीडीसी रिसॉर्टमध्ये २४ ऑगस्टपासू
कांग्रेस के पूर्व अध्यक्ष और लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी (फाइल फोटो)।


नाशिक, १ सप्टेंबर (हिं.स.) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी बुधवारी, २ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राज्यस्तरीय निवासी शिबिराचा समारोप होणार आहे. गंगापूर धरणालगतच्या एमटीडीसी रिसॉर्टमध्ये २४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या शिबिरात राज्यातील ३५ जिल्ह्यांचे शहर व जिल्हाध्यक्ष अशा ७२ पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे.

या शिबिरात पक्ष संघटन मजबूत करणे, आगामी राजकीय वाटचाल तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिराच्या समारोपासाठी राहुल गांधी बुधवारी सकाळी शिबिरस्थळी पोहोचणार असून, दिवसभर ते शिबिरार्थींशी संवाद साधून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. आगामी काळातील पक्षाची राजकीय रणनीती आणि संघटनात्मक तयारीबाबतही या संवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्यात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची शक्यता आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे नुकतेच आंदोलन पुकारलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी ते संवाद साधण्याची शक्यता असून, त्यांच्या प्रलंबित प्रश्न व विविध समस्यांची माहिती राहुल गांधी जाणून घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कार्यालयासह राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयाकडूनही नियोजन करण्यात येत आहे. त्यांच्या दौऱ्याचा मार्ग, कार्यक्रमस्थळ तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बंदोबस्ताबाबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि नाशिक पोलिसांकडून तयारी सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande