

नाशिकमध्ये मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
सरकारच्या आश्वासनांवर विश्वास नसल्याचा आरोप
नाशिक, 1 सप्टेंबर (हिं.स.) : आदिवासी विद्यार्थी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. मात्र, भाजपा महायुती सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले असून घाईघाईने मागण्या मान्य केल्याचे सांगत आहे. मात्र, सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येणार नाही, असा दावा सपकाळ यांनी केला.
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भेट देऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सपकाळ यांनी नाशिक विभागात आदिवासींची लोकसंख्या मोठी असल्याने नाशिकमध्ये मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी केली.
आदिवासी विकास विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप
आदिवासी विकास विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. आदिवासींसाठीच्या योजनांचा निधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा दावा त्यांनी केला. मागील दोन वर्षांत 892 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, त्याला राज्यातील फडणवीस सरकार जबाबदार असल्याचे सपकाळ म्हणाले.
विभागातील कथित अनागोंदी कारभार पाहता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच बिंदूनामावलीतील कथित गैरप्रकार दूर करावेत, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारावा आणि सेंट्रल किचन योजना तातडीने बंद करावी, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.
‘छात्रों की गुंज’ अभियानामुळे सरकारची झोप उडाली : सपकाळ
राहुल गांधी यांनी पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. नाशिकप्रमाणेच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच राज्यातील अन्य भागांतही आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
या आंदोलनातील विविध ठिकाणच्या प्रतिनिधींची भेट घेण्याचा काँग्रेसचा मानस असून, काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला आणि मोर्चाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी 2 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने सरकार घाईघाईने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छात्रों की गुंज’ अभियानावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सपकाळ यांनी भाजप आणि फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची शैली असल्याचा आरोप त्यांनी केला
------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI