
ई-केवायसी व वारस नोंदीची कार्यवाही गतिमान करा; पीक कर्जवाटप व रोजगार निर्मितीच्या कर्ज प्रस्तावांना गती देण्याचे बँकांना निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, मयत शेतकऱ्यांच्या वारस नोंदी तसेच डीएलसी पोर्टलवरील प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. त्याचबरोबर पीक कर्जवाटप आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत पात्र कर्ज प्रस्तावांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ च्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत उद्दिष्टयेपूर्तीसाठी बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृह येथे आज पार पडली. बैठकीत जिल्हाउपनिबंधक समृत जाधव, अर्गणी जिल्हा बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे,कृषी पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक,सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक,रिजर्व बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी, ई-केवायसी, डीएलसी पोर्टलवरील तक्रारी, मयत शेतकऱ्यांच्या वारस नोंदी, सन २०२६-२७ मधील पीक कर्जवाटप तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या बँकनिहाय कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
कर्जमाफीची मर्यादा दोन लाख रुपये
योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कर्जवाटप झालेली आणि दि. ३० सप्टेंबर २०२५ व दि. ३१ मार्च २०२६ रोजी थकीत असलेली पात्र कर्जखाती विचारात घेतली जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची तरतूद आहे.
एकवेळ समझोता योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड केलेल्या तसेच सन २०२५-२६ मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ अनुज्ञेय आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis