
नवी दिल्ली , 01 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळच्या भीषण पुरात आतापर्यंत 987 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे की, 3,916 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्यांमध्ये 275 भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे 128 जणांचा समावेश आहे. यातील बहुतांश जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेले भाविक आहेत. मात्र, मार्गातच त्यांना या भीषण आपत्तीचा फटका बसला. आपल्या प्रियजनांचा शोध घेण्यासाठी भटकणाऱ्या हताश नातेवाईकांना मदत करण्यासाठी सरकारने सापडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे असलेला पॉवरपॉइंट स्लाइड शो तयार केला आहे. याच्या माध्यमातून नातेवाईकांना आपल्या प्रियजनांची ओळख पटवता येणार आहे.
आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये किती परदेशी पर्यटक किंवा यात्रेकरू आहेत, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.दरम्यान नेपाळमधील भारतीय दूतावासाने भारतीय कुटुंबीयांना त्यांच्या प्रियजनांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दूतावासाने सांगितले की, नेपाळ सरकार मृत व्यक्तींची छायाचित्रे आणि त्यांच्याशी संबंधित माहिती प्रसिद्ध करत आहे. ही माहिती वेब लिंकच्या माध्यमातून पाहता येणार आहे. एखाद्या कुटुंबाला छायाचित्रांच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवता आली, तर दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पार्थिव देह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यापासून ते भारतात परत आणण्यापर्यंतच्या प्रक्रियेत पूर्ण मदत करेल.
नेपाळ सरकारने मृतदेहांवर दावा करण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित केली आहे. दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, आरोग्याशी संबंधित धोके टाळण्यासाठी मोठ्या संख्येने मृतदेह तात्पुरते दफन करण्यात आले आहेत. अशा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी प्रथम श्रेणीतील नातेवाईकांसोबत डीएनए चाचणीद्वारे जुळणी करावी लागणार आहे.ज्या प्रकरणांमध्ये मृतदेहांची ओळख पटलेली नाही किंवा ते तात्पुरते दफन करण्यात आले आहेत, अशा प्रकरणांमध्ये नेपाळचे अधिकारी डीएनए जुळणीची सुविधा उपलब्ध करून देतील.
नेपाळी अधिकारी डीएनए प्रोफाइल तयार करण्यासाठी मृतदेहांचे डीएनए नमुने घेत आहेत. डीएनए जुळणीसाठी मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक आपले डीएनए प्रोफाइल dnacodis@nepalpolice.gov.np या ई-मेलवर पाठवू शकतात. तसेच, नेपाळी अधिकाऱ्यांनी मागितलेल्या प्राथमिक माहितीसह रक्ताचे नमुनेही देता येतील. ही प्रक्रिया सुलभ व्हावी आणि मदत मिळावी यासाठी प्रथम श्रेणीतील नातेवाईकांचे डीएनए प्रोफाइल भारतीय दूतावासाच्या eoikathmandufloodsupport@gmail.com या ई-मेलवरही पाठवता येतील.
डीएनए प्रोफाइलिंगशी संबंधित अधिक माहिती नेपाळ पोलिसांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच, त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर +977 9841616095 संपर्क साधता येईल. इतर कोणत्याही मदतीसाठी किंवा चौकशीसाठी भारतीय दूतावासाशी +977 9851316807, +977 9709107500 किंवा +977 9810326117 या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
मृतदेहांची ओळख पटवण्याचा मोठा दबाव आणि अनेक मृतदेहांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता, नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सामूहिक दफन करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून त्यावर टॅग आणि ठिकाणाचा क्रमांक लावला जात आहे.मृतदेह उथळ कबरीत दफन करण्यापूर्वी अधिकारी त्यांचे डीएनए नमुने घेत आहेत. भविष्यात डीएनए जुळणीच्या माध्यमातून या मृतदेहांची त्यांच्या कुटुंबीयांकडून ओळख पटवता येईल आणि योग्य अंत्यसंस्कारासाठी ते कुटुंबीयांच्या ताब्यात देता येतील, अशी अधिकाऱ्यांना आशा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode