लातूर पोलिसांकडून हेल्मेटधारक दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन
लातूर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. रस्ते अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर पोलीस विभागाने दंडात्मक कारवाईसोबतच जनजागृतीवरही भर द
लातूर पोलीस


लातूर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. रस्ते अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर पोलीस विभागाने दंडात्मक कारवाईसोबतच जनजागृतीवरही भर दिला आहे. हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम पहिल्याच दिवशी राबविण्यात आला.

हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीपूर्वी लातूर पोलिसांकडून विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. हेल्मेट वापरणे ही केवळ कायदेशीर बाब नसून स्वतःचे आणि कुटुंबाचे जीवन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या संपूर्ण उपक्रमाचा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून नियमित आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदारांनी नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेल्मेट वापरणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन

हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्यासह औसा महामार्गावर प्रत्यक्ष उपस्थित राहून हेल्मेट परिधान करून दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.

हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना नियमितपणे हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांशी संवाद साधून अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीपासून हेल्मेट कशा प्रकारे संरक्षण देते, याची माहिती देण्यात आली. पुढील प्रवासापासून नियमितपणे हेल्मेट वापरण्याचे आवाहनही करण्यात आले.

चाकूर, निलंगा उपविभागातही जनजागृती

हेल्मेट सक्तीच्या उपक्रमाला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळावा यासाठी पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करत आहेत. चाकूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मायने तसेच निलंगा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल दुमे यांनीही रस्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहून दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले.

कायमस्वरूपी हेल्मेट संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न

हेल्मेट सक्तीचा उपक्रम केवळ काही दिवसांपुरता मर्यादित न ठेवता जिल्ह्यात कायमस्वरूपी हेल्मेट वापरण्याची संस्कृती रुजविण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. लातूर जिल्ह्यातील दुचाकीस्वारांकडून शंभर टक्के हेल्मेट वापर होईपर्यंत या उपक्रमाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.

कायद्याची अंमलबजावणी करताना नागरिकांनी स्वेच्छेने आणि जबाबदारीने हेल्मेट वापरावे, यासाठी जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे.

‘हेल्मेट घाला, जीवन वाचवा’

दुचाकीवर प्रवास करताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन लातूर पोलीस विभागाने केले आहे. हेल्मेट हे दंडापासून वाचण्याचे साधन नसून अपघाताच्या वेळी जीव वाचविणारे सुरक्षा कवच आहे. स्वतःच्या सुरक्षिततेसोबतच आपल्या कुटुंबाचा विचार करून प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करावे.

लातूर पोलिसांच्या या जनजागृती उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करून स्वतः हेल्मेट वापरावे आणि इतरांनाही हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande