
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी बिस्किट आणि कन्फेक्शनरी बनवणारी कंपनी पारले बिस्किट्सने जॉर्ज कोवूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे.
पारले-जी, मोनॅको, हाइड अँड सीक आणि मेलडी यांसारखी उत्पादने बनवणाऱ्या पारले बिस्किट्सने मंगळवारी जॉर्ज कोवूर यांची सीईओ म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. जॉर्ज कोवूर यांना पेप्सिकोसोबत काम करण्याचा तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी ग्राहक व्यवसाय आणि विविध बाजारपेठांमध्ये काम केले आहे.
कंपनीने सांगितले की, त्यांची नियुक्ती १ सप्टेंबर २०२६ पासून प्रभावी झाली आहे. पारलेने म्हटले आहे की, कंपनी आपल्या टॉप लीडरशिप टीमला मजबूत करत आहे, कारण ती विकासाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करू इच्छित आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय चौहान म्हणाले, ‘‘आम्ही जॉर्ज कोवूर यांचे स्वागत करतो. पारलेची मजबूत पायाभरणी पुढे नेण्यासाठी, आपल्या क्षमता मजबूत करण्यासाठी तसेच सातत्यपूर्ण वाढीच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’’ त्यांनी पुढे सांगितले की, कंपनीला विकासाच्या पुढील टप्प्यात त्यांच्या नेतृत्वाची आणि योगदानाची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule