छ. संभाजीनगर : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज
छत्रपती संभाजीनगर, १ सप्टेंबर (हिं.स.) : संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पर्जन्यमानात घट होऊन पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात
छ. संभाजीनगर : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज


छत्रपती संभाजीनगर, १ सप्टेंबर (हिं.स.) : संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पर्जन्यमानात घट होऊन पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती तसेच अन्य आवश्यक बाबींसाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन आणि प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक पाझर तलाव व बंधाऱ्याची नियमित पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तहसीलस्तरावर प्रत्येक पाझर तलाव आणि बंधाऱ्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही पथके संबंधित प्रकल्पांना नियमित प्रत्यक्ष भेटी देऊन जलसाठा आणि पाणी उपलब्धतेवर लक्ष ठेवणार आहेत.या विशेष पथकांमध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा विस्तार अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील अभियंता, उपविभागीय किंवा कनिष्ठ अभियंता, जलसंपदा अथवा पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी, जिल्हा परिषद विभागातील अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी, सहायक कृषी अधिकारी, पोलीस बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, कार्यालय तसेच मोबाईल क्रमांक आदेशात नमूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनधिकृत पाणी उपशावर कडक नजर

विशेष पथकांकडून संबंधित प्रकल्पातील सद्यस्थितीतील जलसाठा आणि उपलब्ध पाण्याची स्थिती तपासण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या जलसाठ्याचा अनधिकृत वापर होत नाही ना, यावरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.नदी, नाला, तलाव किंवा बंधाऱ्यातील पाणी अनधिकृत पंप, मोटार, पाइपलाइन अथवा अन्य साधनांद्वारे उपसले जात असल्याचे आढळल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यासह संबंधित विभागांच्या समन्वयातून तातडीने प्रतिबंधात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी संभाव्य टंचाई निर्माण होऊ शकणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची सद्यस्थिती तपासून पाणी उपलब्धतेची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असलेल्या गावांची पूर्वसूचना आणि पूर्वतयारीच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कार्यक्षेत्रात पाणीटंचाईसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारीही या पथकांवर सोपविण्यात आली आहे.

दररोज क्षेत्रभेटी, स्वतंत्र नोंदवही

विशेष भरारी पथकांनी प्रकल्पनिहाय दररोज क्षेत्रभेटी देऊन प्रत्येक भेटीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या नोंदवहीत भेटीचा दिनांक, प्रकल्पाचे नाव, जलक्षमता, उपलब्ध जलसाठा, आढळलेल्या त्रुटी अथवा अनियमितता आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची नोंद करावी लागणार आहे.गंभीर स्वरूपाची बाब, अनधिकृत पाणी उपसा, पिण्याच्या पाण्याच्या स्रोताला धोका किंवा विद्युत पुरवठ्याशी संबंधित गंभीर बाब निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने तहसीलदारांना देण्याचे निर्देश आहेत. तहसीलदारांनी पथकनिहाय दैनंदिन अहवाल ‘गुगल शीट्स’द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या कामात कोणतीही दिरंगाई अथवा टाळाटाळ होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande