
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर (हिं.स.)बेन स्टोक्स बिग बॅश लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. ॲडलेड स्ट्रायकर्सने त्याला करारबद्ध केले आहे. बेन स्टोक्सने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो २०२६-२७ हंगामापर्यंत लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. यापूर्वी त्याने २०१४-१५ मध्ये मेलबर्न रेनेगेड्ससाठी चार सामने खेळले होते, ज्यात त्याने १२८ धावा केल्या होत्या आणि तीन बळी घेतले होते. या हंगामात बीबीएलमध्ये सामील होणारा स्टोक्स हा पहिला परदेशी खेळाडू आहे.
स्टोक्स २०२६-२७ च्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असणार आहे. गेल्या आठवड्यात बीबीएलमध्ये क्रिकेटपटूंच्या कराराची नवीन रचना निश्चित करण्यात आली. ज्याद्वारे पुन्हा एकदा 'थेट करार' (direct-signing) पद्धत लागू झाली आणि क्लब्सना आपला निधी कोठे खर्च करायचा याचे अधिक स्वातंत्र्य मिळाले. या नवीन रचनेनंतर संघात सामील होणारा स्टोक्स हा पहिलाच परदेशी क्रिकेटपटू ठरला आहे.
यामुळे स्टोक्ससारख्या खेळाडूंना मोठ्या रकमेचे करार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा करार सुमारे ५,००,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे ३,६०,००० अमेरिकन डॉलर्स) इतका आहे;. ही रक्कम मसुदा प्रक्रियेतील (ड्राफ्ट) 'प्लॅटिनम' श्रेणीसाठी यापूर्वी निश्चित केलेल्या सर्वाधिक ४,२०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या मर्यादेपेक्षा बरीच जास्त आहे. आगामी आठवड्यांत करारबद्ध होणाऱ्या इतर परदेशी क्रिकेटपटूंनाही अशाच प्रकारे मोठी रक्कम मिळू शकते.
स्टोक्सने एका निवेदनात म्हटले, बीबीएल १६ साठी ॲडलेड स्ट्रायकर्स संघात सामील होण्यास मी उत्सुक आहे. मला ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला नेहमीच आवडले आहे, आणि जेव्हा स्ट्रायकर्स संघात सामील होण्याची संधी मिळाली, तेव्हा मी ती सोडू शकलो नाही. ॲडलेडचे प्रशिक्षक टिम पेन स्टोक्सच्या कराराबद्दल म्हणाले, तो या खेळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याने स्वतःला सामना जिंकून देणारा क्रिकेटपटू म्हणून सिद्ध केले आहे.
स्टोक्स आगामी बीबीएल हंगामातील आपला पहिला सामना सिडनी थंडरविरुद्ध खेळेल, जो १६ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे होणार आहे. थंडरच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि बाबर आझम यांसारख्या नावांचा समावेश आहे. गेल्या हंगामात, क्लबने आर अश्विनलाही करारबद्ध केले होते, पण तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
स्टोक्स २०२४ मधील हंड्रेड लीगनंतर टी२० क्रिकेट खेळलेला नाही. तो २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकन टी२० लीगमध्ये एमआय केप टाऊनकडून खेळणार होता, पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ते शक्य झाले नाही. तो शेवटचा आयपीएलमध्ये २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. तो दोन सामन्यांसाठी संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये होता. त्यानंतर त्याने स्वतःला अनुपलब्ध केले आणि तो सध्या आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. तो या लीगमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट आणि राजस्थान रॉयल्सकडूनही खेळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे