नाशिकच्या खड्ड्यांचा नववा बळी; अपघातात युवकाचा मृत्यू
नाशिक, १ सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले असून, सातपूर परिसरातील निले कंपनी येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे झालेल्या भीषण अपघातात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ४२ वर्षीय युवक
Social worker dies in road accident


नाशिक, १ सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले असून, सातपूर परिसरातील निले कंपनी येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे झालेल्या भीषण अपघातात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ४२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुजित राजेंद्र गायकवाड (रा. राहुल नगर, पवारवाडी, जेलरोड, नाशिक रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. शहरातील खड्ड्यांमुळे झालेला हा नववा बळी असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत असून, या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित गायकवाड हे आज सकाळी सुमारे ११ वाजता सातपूर येथील निले कंपनी परिसरातून दुचाकीवरून जात होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि खड्डे असल्याने वाहनचालकांची मोठी कसरत सुरू होती. त्याचवेळी पुढे जाणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने सुजित यांच्या दुचाकीची कारला पाठीमागून धडक झाली.या धडकेत सुजित दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या छोटा हत्ती वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

सामाजिक कार्यात सदैव पुढे

सुजित गायकवाड हे जेलरोड परिसरातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय युवक म्हणून परिचित होते. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समजताच मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली. हसतमुख आणि सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणाऱ्या सुजित यांच्या अकाली निधनाने जेलरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ आणि १२ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या सुजित यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे काढून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande