आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान’ एल्गार; नाशिकमध्ये हजारोंचा विराट मोर्चा
Tribal students' 'Ulgulan' Elgar; Thousands march in Nashik
Tribal students' 'Ulgulan'


Tribal students' 'Ulgulan'


नाशिक, 01 सप्टेंबर (हिं.स.) : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) नाशिक शहरात आदिवासी विद्यार्थ्यांनी ‘उलगुलान’ मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गोल्फ क्लब मैदान, एम.जी. रोड, जिल्हाधिकारी कार्यालय ते आदिवासी विकास आयुक्तालय या मार्गाने निघालेल्या या विराट मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी आणि समाजबांधव सहभागी झाले. घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

गेल्या १५ दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमधील विद्यार्थी तसेच आदिवासी समाजातील विविध प्रतिनिधी आपल्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. आजच्या मोर्चात विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती ही आंदोलनाची प्रमुख ताकद ठरली.वसतिगृह व आश्रमशाळांमधील सोयी-सुविधा, शिक्षण, रोजगार, पोषण आहार तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांमधील सुविधा व पोषण आहाराबाबत काढलेल्या वादग्रस्त शासन निर्णयाविरोधातही विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मोर्चादरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडत शासनाला स्पष्ट इशारा दिला. “शासनाने आमच्या सर्व रास्त आणि प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्या पूर्ण करेपर्यंत हे उलगुलान आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलनाच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

खा. राहुल गांधी आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी बुधवारी (दि. २ सप्टेंबर) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या दौऱ्याकडेही आंदोलकांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande