रत्नागिरी : एनसीएमसी कार्डासाठी प्रवाशांची मोठी झुंबड
रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । एसटीने सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) मिळविण्यासाठी आज रत्नागिरी एसटी स्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची मोठी गर्दी झाली. ठरावीक वेळेतच हे कार्ड उपलब्ध क
एनसीएमसी कार्डासाठी प्रवाशांची उडालेली झुंबड


रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । एसटीने सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) मिळविण्यासाठी आज रत्नागिरी एसटी स्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची मोठी गर्दी झाली.

ठरावीक वेळेतच हे कार्ड उपलब्ध करून दिले जात असल्याने नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र होते.

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी एसटी प्रवासात विविध सवलतीच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता एनसीएमसी कार्ड अत्यावश्यक आहे. कार्ड नसल्यास प्रवाशांना पूर्ण तिकीट दराने प्रवास करावा लागू शकतो, तर कार्ड उपलब्ध असल्यास संबंधित सवलतीच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना १०० टक्के तिकीट सवलत, तर ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के तिकीट सवलत मिळते. तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत देण्यात येते.

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक असल्याने कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांनी एसटी स्थानक परिसरात मोठी गर्दी केली होती. आजपासून कार्ड सक्तीचे करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या विशेषतः मोठी होती.

ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेता एसटीने कार्ड वितरणासाठी अधिक कर्मचारी नियुक्त करून स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वृद्ध नागरिकांना रांगेत उभे राहण्याचा त्रास होऊ नये, यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande