
सोलापूर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडून पंढरपूर तालुक्यातील सोनके तलाव १०० टक्के भरून घेण्यात यावा, या मागणीसाठी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सोनके येथील इनलेट गेटजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात समाधान फाटे, तानाजी गोफणे, दिगंबर वाघमारे आणि संतोष गायकवाड सहभागी झाले आहेत. तलावात पाणी सोडले जात नसल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरणे १०० टक्के भरल्यानंतर दरवर्षी नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडून सोनके तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेतला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने कालव्यातील पाणी उभ्या पिकांसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दीड महिन्याचा कालावधी उलटूनही सोनके तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. परिणामी तलाव कोरडा पडला आहे.
सोनके तलावावर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गादेगाव, पळशी, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, शेळवे, खेड भाळवणी आणि शिरढोण या गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही, तर या परिसरातील गावांना आगामी काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नीरा उजवा कालव्यातून सोनके तलावासाठी पाणी सोडावे आणि तलाव १०० टक्के भरून घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड