सोलापूर - २०२६-२७ गाळप हंगामाची साखर आयुक्तालयाकडून तयारी
सोलापूर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची वाढ खुंटली असून, आगामी हंगामात ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच बाजारातील साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.
sugar mill


सोलापूर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची वाढ खुंटली असून, आगामी हंगामात ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच बाजारातील साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाने २०२६-२७ या वर्षाच्या ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे.

येत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत संबंधित साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. प्राप्त अर्ज आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या स्तरावरून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी संबंधित सहकारी साखर कारखान्यांना शासन निर्णयानुसार थकीत शासकीय भागभांडवल, कर्ज आणि हमीशुल्काची रक्कम निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी शासनाकडे जमा करावी लागणार आहे. त्याचबरोबर मागील गाळप हंगामातील संपूर्ण ऊस बिल शेतकऱ्यांना अदा केलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी ऊस नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘महा-ऊस नोंदणी’ ॲपवर ऑनलाइन अपलोड करण्याच्या सक्त सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.

या प्रक्रियेमुळे यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रत्यक्ष नोंद झालेल्या ऊस क्षेत्राची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. परिणामी, कारखान्यांना उपलब्ध होणाऱ्या उसाचे क्षेत्र आणि संभाव्य गाळपाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.

यंदा पावसाच्या कमतरतेमुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध ऊस, संभाव्य साखर उत्पादन आणि बाजारातील मागणी यांचा समतोल राखण्याचे आव्हान साखर उद्योगासमोर राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande