
परभणी, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
बैलपोळा सणाचे औचित्य साधून मानवत तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील निराधार विधवा रेखा कृष्णा ठोंबरे यांना उदरनिर्वाहासाठी शेळी व करडू भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज परभणी यांच्या वतीने करण्यात आले.
पतीच्या निधनानंतर रेखाताईंवर दोन मुलांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी आली आहे. भूमिहीन असलेल्या त्या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा इयत्ता पाचवीत, तर मुलगी इयत्ता पहिलीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. रोजच्या मजुरीतून घरखर्च व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे तात्पुरत्या मदतीऐवजी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने शेळी व करडू देण्यात आले. याप्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, शिवाजी महाविद्यालय परभणीचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, सेलू तालुक्याचे गटविकास अधिकारी उदय जाधव, सरपंच केशव सोळंके, तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
या उपक्रमासाठी डॉ. बाळासाहेब जाधव, राजकुमार भगत, डॉ. श्रीनिवास केशट्टी, आलोक जोशी, विनोद भाला, मुकुंद कुलथे, अर्चना वट्टमवार आणि मीनल मोहन बालगरकाशी यांनी आर्थिक सहयोग दिला. महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांतर्गत एचएआरसीने आतापर्यंत हिंगोली व परभणी जिल्ह्यातील १०१ निराधार, विधवा व गरजू महिलांना विविध उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis