
कोलकाता, 10 सप्टेंबर (हिं.स.) : अदाणी समूहाकडून पश्चिम बंगालमध्ये 3 महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू असून, 24 सप्टेंबर रोजी या प्रकल्पांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या तीन प्रकल्पांमध्ये राइटर्स बिल्डिंगचे नूतनीकरण, उत्तर कोलकात्यातील कुमारतुली घाटाचा पुनर्विकास आणि न्यू टाउन येथे दोन हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर सुरू झालेल्या विविध प्रकल्पांमध्ये ऐतिहासिक राइटर्स बिल्डिंगच्या नूतनीकरणाचा समावेश आहे. अदानी समूहाने या इमारतीची पाहणी करण्यासाठी यापूर्वीच एक पथक पाठवले असून, ब्रिटिशकालीन या वास्तूचे मूळ स्वरूप शक्य तितके जतन करून तिचे पुनरुज्जीवन कसे करता येईल, याचा अभ्यास सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी समूह तयार आहे.
कुमारतुली घाटाचा पुनर्विकास
अदानी समूहाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत कुमारतुली घाटाचा पुनर्विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प कलकत्ता पोर्टच्या सहकार्याने राबवला जाणार असून, त्यासाठी अंदाजे 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कुमारतुली घाट आणि चंपतला घाट यांच्यामधील सुमारे 300 मीटरच्या परिसरात असलेल्या वारसास्थळे, मंदिरे आणि धार्मिक स्थळांचे नूतनीकरण या प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे.याशिवाय नदीकाठाची सुरक्षा मजबूत करणे, पादचारी मार्ग सुधारणे, नदीपर्यंत नागरिकांना सुलभ प्रवेश उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा तयार करणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे तसेच बोटिंगसारख्या मनोरंजनात्मक उपक्रमांना चालना देणे, अशी कामे प्रस्तावित आहेत. परिसरात वृक्षारोपण, प्रकाशयोजना आणि निगराणी यंत्रणाही उभारण्यात येणार आहे.
न्यू टाउनमध्ये 2,000 खाटांचे रुग्णालय
अदाणी समूहाचा तिसरा आणि महत्त्वाचा प्रकल्प न्यू टाउन येथे 2,000 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा आहे. यासंदर्भातील माहितीनुसार राज्याच्या विकासासाठी काही मोठे काम करण्याच्या आवाहनानंतर अदानी समूहाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे सांगितले जात आहे.
या रुग्णालयातील 1,000 खाटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत, तर उर्वरित 1,000 खाटांचा व्यावसायिक पद्धतीने वापर केला जाणार आहे.
दरम्यान, कोलकात्यात टाटा समूहाचे टाटा मेडिकल सेंटर हे प्रसिद्ध कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रही न्यू टाउन, राजारहाट येथे कार्यरत आहे.
डीप-सी पोर्टच्या निविदेतही रस
याशिवाय पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील दादानपात्राबार येथे प्रस्तावित डीप-सी पोर्ट प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासही अदानी समूहाने स्वारस्य दाखवल्याचे वृत्त आहे.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून अदानी समूहासारख्या मोठ्या उद्योगसमूहांवर भर दिला जात असल्याचे मानले जात आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि वारसास्थळांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी