गणेशोत्सवासाठी अमरावती पोलीस दल सज्ज
अमरावती, 10 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून, सु
गणेशोत्सवासाठी अमरावती पोलीस दल सज्ज


अमरावती, 10 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून, सुमारे १३५ पोलीस अधिकारी आणि १ हजार ८०० अंमलदार व होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासोबतच तडीपार करण्यात आलेल्या समाजकंटकांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तडीपार व्यक्ती शहरात किंवा संबंधित हद्दीत आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मिरवणुकीच्या मार्गावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीत लेझर लाईट, धोकादायक प्रकाशयोजना किंवा इतर त्रासदायक साधनांचा वापर होणार नाही, याचीही पोलिसांकडून दक्षता घेतली जाणार आहे. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची मंडळांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी केले आहे. ध्वनिक्षेपकांचा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना डेसीबल मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ध्वनीची पातळी प्रत्यक्ष मोजून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.गणेश मंडळांनी पोलिसांनी दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करावे, तसेच नागरिकांनीही शांतता, शिस्त आणि सुरक्षितता राखत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. उत्सवादरम्यान सोशल मीडियावरील अफवा किंवा आक्षेपार्ह संदेशांवरही पोलिसांचे लक्ष राहणार असून, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे ही पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande