
बीड, 10 सप्टेंबर (हिं.स.)।अंबाजोगाई शहरातील रिंगरोडवर एका मद्यधुंद ट्रकचालकाने एका कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या धडकेत गित्ता (ता. अंबाजोगाई) येथील कारचालक गंभीर जखमी झाला आहे. मद्यपी चालकांच्या वाढत्या मुजोरीमुळे सर्वसामान्यांचा जीव रस्त्यावर किती असुरक्षित झाला आहे, हे या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे.
रिंगरोडवरील मोदी लर्निंग सेंटरपुढील वळणावर हा थरार घडला. कार (MH44AG0450) भगवानबाबा चौकाकडे जात असताना समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने (MH40CM0060) कारला धडक दिली. अपघातास कारणीभूत असलेला ट्रकचालक इतक्या भयंकर नशेत होता की, त्याला साधे चालता किंवा बोलताही येत नव्हते. नशेत तर्र असलेल्या या चालकाने निष्पाप कारचालकाचा जीव अक्षरशः धोक्यात घातला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या बेधुंद ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis