कुणबी प्रमाणपत्रासाठी धाराशिव तालुक्यात ११ ठिकाणी विशेष शिबिरे
धाराशिव, १० सप्टेंबर (हिं.स.) : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी प्रशासनाने विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.
कुणबी प्रमाणपत्रासाठी धाराशिव तालुक्यात ११ ठिकाणी विशेष शिबिरे


धाराशिव, १० सप्टेंबर (हिं.स.) : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी प्रशासनाने विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. धाराशिव तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये ११ आणि १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ही शिबिरे होणार आहेत. पात्र नागरिकांनी आपल्या नजीकच्या शिबिरात उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी केले आहे.

धाराशिव उपविभागात धाराशिव आणि तुळजापूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. ३ सप्टेंबर २०२६पर्यंत कुणबी जात प्रमाणपत्राबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी एकूण पाच अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी चार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कुणबी प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या ९,१४६ अर्जांपैकी ८,९१३ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्रमाणपत्र वाटपाची ही टक्केवारी ९७.४५ टक्के आहे.

एसईबीसी प्रमाणपत्रांचेही मोठ्या प्रमाणात वाटप

धाराशिव उपविभागांतर्गत SEBC १० टक्के प्रमाणपत्रांचेही मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये ४,३९२, सन २०२५ मध्ये ३,९४४, तर सन २०२६ मध्ये आतापर्यंत २,८६१ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

पात्र नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रांसाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्रशासनाने कार्यवाही अधिक गतिमान केली आहे.

गणेश शिंदे नोडल अधिकारी

कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या ३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार गणेश शिंदे, उपविभागीय अधिकारी, कळंब यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या ११ ठिकाणी होणार शिबिरे

धाराशिव शहर मंडळ — ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, धाराशिव शहर

धाराशिव ग्रामीण मंडळ — हनुमान मंदिर, देवळाली

येडशी मंडळ — ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, येडशी

अंबेजवळगा मंडळ — हनुमान (मारुती) मंदिर, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, अंबेजवळगा

ढोकी मंडळ — ग्रामपंचायत कार्यालय, ढोकी

तेर मंडळ — ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, तेर

पाडोळी मंडळ — श्री देवी अकुबाई मंदिर परिसर, पाडोळी (आ)

करजखेडा मंडळ — ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, चौरस्ता करजखेडा

केशेगाव मंडळ — ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, केशेगाव

जागजी मंडळ — ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, जागजी

बेंबळी मंडळ — मंडळ अधिकारी कार्यालय, बेंबळी

ही सर्व विशेष शिबिरे ११ आणि १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू होतील. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांनी संबंधित शिबिराच्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी केले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande