
नवी दिल्ली, १० सप्टेंबर (हिं.स.)। दिल्ली उच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि त्यांचे नेते अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना भाजप नेते आणि वकील गौरव भाटिया यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपलोड केलेल्या पोस्ट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती तुषार राव गडेला यांच्या खंडपीठाने कॉकरोच जनता पार्टीच्या तिन्ही नेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाला सूचना घेऊन न्यायालयाला कळवण्याचे निर्देश दिले.
गौरव भाटिया यांनी सीजेपी नेत्यांकडून २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर अंतरिम मनाई हुकूम मागितला आहे. भाटिया यांनी आरोप केला आहे की, सीजेपी आणि त्यांच्या नेत्यांनी एआय-निर्मित ग्राफिक्सद्वारे स्वतंत्र भारद्वाज यांच्याबद्दल खोटी माहिती त्यांच्या नावावर लावली आहे.
भारद्वाज यांच्यावर सीजेपीच्या एका कार्यकर्त्याच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्या पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, गौरव भाटिया यांनी स्वतंत्र भारद्वाज यांना 'बुद्धीहीन नक्षलवादी' म्हटले होते. सौरभ दासने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ग्राफिक शेअर केले. गौरव भाटिया यांनी सौरभ दासवर त्याच्या सोशल मीडिया खात्यावर न्यायालयाविषयी असंबद्ध मजकूर पोस्ट केल्याचा आरोप केला आहे.
याचिकेत म्हटले आहे की, सौरभ दासने त्याच्या सोशल मीडिया खात्यावरून न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्यावर टीका केली आणि त्यांना केजरीवाल यांच्या खटल्याच्या सुनावणीतून स्वतःला दूर ठेवण्यास सांगितले. सौरभ दासने त्याच्या सोशल मीडिया खात्यावरून दिल्ली दंगलीचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या उमर खालिदच्या बाजूनेही मत व्यक्त केले. असे करणे म्हणजे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्यासारखे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे