शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
छत्रपती संभाजीनगर, १० सप्टेंबर (हिं.स.) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार अन्नधान्याचा लाभ दिला जातो. अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने शिधापत्रिकेवरील पात्र लाभार्थ्यांच
शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत


छत्रपती संभाजीनगर, १० सप्टेंबर (हिं.स.) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार अन्नधान्याचा लाभ दिला जातो. अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने शिधापत्रिकेवरील पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने ‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजनेप्रमाणेच लाभार्थ्यांना आपल्या स्वगावी किंवा संबंधित राज्यात न जाता देशातील कोणत्याही ठिकाणाहून ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ई-पॉस (e-POS) मशीनवर कार्यान्वित करण्यात आली आहे.

ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय आणि स्वस्त धान्य दुकाननिहाय यादी शासनाकडून प्राप्त झाली असून, ही यादी संबंधित तहसील कार्यालये तसेच स्वस्त धान्य दुकानदारांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या यादीतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह आधारकार्ड घेऊन संबंधित स्वस्त धान्य दुकानात जावे. तेथे ई-पॉस मशीनवर अंगठ्याचे प्रमाणीकरण करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच ‘Mera KYC’ मोबाईल अॅप्लिकेशनद्वारेही सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ज्या लाभार्थ्यांचे निर्धारित मुदतीत ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण होणार नाही, अशा लाभार्थ्यांचा अन्नधान्याचा लाभ थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी आपले ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande