
‘देर आये, दुरूस्त आये’ म्हणत केली ट्विटरवर पोस्ट
लखनऊ, 10 सप्टेंबर (हिं.स.) : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी अशोक सिद्धार्थ यांच्या राजकारणातून संन्यास घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय ‘उशिरा आले, पण दुरुस्त आले’ असा असल्याचे म्हटले आहे. मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सिद्धार्थ यांच्या निर्णयावर भाष्य केले.
मायावती म्हणाल्या की, हा निर्णय यापूर्वीच घेतला असता, तर बसपा, बहुजन आंदोलन आणि त्यांचे जावई आकाश आनंद यांना वारंवार प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला नसता.
बसपाची राजकीय वाटचाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम यांच्या त्याग, समर्पण तसेच वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वार्थापासून दूर राहण्याच्या तत्त्वांवर आधारित असल्याचे मायावती यांनी पुन्हा स्पष्ट केले. बहुजन समाजाला सत्ताधारी वर्ग बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पदाची लालसा आणि वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून मोठ्या त्यागासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची केलेली घोषणा हा योग्य निर्णय असला, तरी तो अत्यंत उशिरा घेतल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
आकाश आनंद यांच्यावरही गंभीर आरोप
मायावती यांनी अशोक सिद्धार्थ आणि आकाश आनंद यांच्यावर पक्षहितापेक्षा कौटुंबिक स्वार्थाला प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. आकाश आनंद यांच्यात पक्षाप्रती निष्ठेचा अभाव दिसून आल्याचे त्यांनी म्हटले. सासऱ्यांच्या मोहापोटी त्यांनी बसपाच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टचे पुनर्प्रसारण (रिपोस्ट)देखील केले नसल्याचा आरोप मायावती यांनी केला. आकाश आनंद यांच्या ‘दुटप्पी भूमिके’मुळे तसेच बहुजन आंदोलनाप्रती असलेल्या बांधिलकीच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आल्याचे मायावती यांनी सांगितले. राष्ट्रीय संयोजकपद काढून घेतल्यानंतर आता त्यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून तसेच प्राथमिक सदस्यत्वातूनही पूर्णपणे मुक्त करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशात पुन्हा बहुमताचे सरकार स्थापण्याचे आवाहन
मायावती यांनी शेवटी बसपा कार्यकर्त्यांना विरोधकांच्या कथित षड्यंत्रांचा सामना करण्याचे आवाहन केले. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या ध्येयाने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी