
ढाका, 10 सप्टेंबर (हिं.स.)।चीनमध्ये बनवण्यात आलेल्या रणगाड्यांचा वापर करणे बांगलादेशला चांगलेच महागात पडले आहे. बांगलादेशच्या लष्कराकडून वापरण्यात येणाऱ्या एका चिनी रणगाड्याचा सरावादरम्यान अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवान रणगाड्याच्या आतून गोळीबाराचा सराव करत असताना अचानक हा स्फोट झाला. या घटनेमुळे चीनमध्ये बनवण्यात येणाऱ्या लष्करी शस्त्रास्त्रांची गुणवत्ता आणि त्यांच्या सुरक्षेच्या मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
माहितीनुसार, ही दुर्घटना बुधवारी बांगलादेशच्या चट्टोग्राममधील हथाजारी येथील फील्ड फायरिंग रेंजमध्ये लष्करी सरावादरम्यान घडली. ज्या रणगाड्यात स्फोट झाला, तो चीनमध्ये बनवण्यात आलेला ‘टाइप ५९’ रणगाडा असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्करी सरावादरम्यान बांगलादेशी लष्कराच्या या चिनी रणगाड्याने गोळी डागताच त्याला भीषण आग लागली. रणगाड्याच्या नळीमध्येच गोळा फुटल्याने झालेल्या भीषण स्फोटात दोन बांगलादेशी जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक लष्करी अधिकारी गंभीर जखमी झाला.
बांगलादेशच्या चट्टोग्राममध्ये घडलेल्या या दुर्घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामुळे ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जवानांनी लक्ष्य साधून चिनी बनावटीच्या रणगाड्याचे ट्रिगर दाबताच संपूर्ण रणगाडा क्षणार्धात भीषण आगीच्या गोळ्यात बदलला.हा कोणत्याही शत्रूचा हल्ला नव्हता किंवा क्षेपणास्त्राचा मारा नव्हता. प्राथमिक माहितीनुसार, रणगाड्याच्या नळीतील बिघाडामुळे गोळा बाहेर जाण्याऐवजी रणगाड्याच्या आतच फुटला. या जोरदार स्फोटामुळे दोन जवानांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, बांगलादेशने पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्या ‘संरक्षण करारात’ सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडली आहे.बांगलादेशच्या लष्कराच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) कडून सांगण्यात आले आहे की, रणगाड्यात झालेल्या स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या लष्करी अधिकाऱ्याला पुढील उपचारांसाठी हवाई मार्गाने ढाका येथील कंबाइंड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (सीएमएच) दाखल करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode