
अमरावती, 10 सप्टेंबर (हिं.स.)। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने गणेश विसर्जनाची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. यंदा विसर्जनाचा सोहळा सलग पाच दिवस चालणार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजनाला वेग दिला आहे.
मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळे असलेल्या छत्री तलाव आणि प्रथमेश तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. यावेळी सुरक्षा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.दस्तुरनगर चौक ते राजापेठ रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून पॅचवर्क करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच दस्तुरनगर चौकापासून विसर्जनस्थळापर्यंतचा मार्ग पुरेशा प्रकाशव्यवस्थेने उजळून काढण्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या.तलाव परिसरात मोबाईल टॉयलेट, अग्निशमन दल, आरोग्य पथक तसेच अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात बाप्पाला निरोप देता यावा, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी