
अधिसूचना रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नाशिक, 10 सप्टेंबर (हिं.स.)। नाशिकरोड ते साईनगर शिर्डीदरम्यान प्रस्तावित दुहेरी रेल्वेमार्गासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादनाला नाशिक व सिन्नर तालुक्यातील बाधित शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पासाठी नवीन भूसंपादन करण्याऐवजी यापूर्वीच संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा, अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करून संबंधित अधिसूचना रद्द करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
नाशिकरोड ते साईनगर शिर्डीदरम्यानच्या दुहेरी रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती शेतकर्यांना मिळाली आहे. रेल्वे विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) भुवनेश कुमार गुप्ता यांनी अधिसूचना प्रसिद्ध करून नाशिकरोड ते साईनगर शिर्डीदरम्यानच्या सुमारे 95.059 किलोमीटर लांबीच्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहेडी खुर्द, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक, चाडेगाव, ब्राह्मणवाडे यांसह सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमधील सुपीक शेतजमीन भूसंपादनाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भूसंपादन रद्द करा, अन्यथा आंदोलन
विद्यमान पर्याय उपलब्ध असतानाही नव्याने भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जात असल्याने बाधित शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रस्तावित भूसंपादनास ठाम विरोध असून, अधिसूचना रद्द करून पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास शेतकर्यांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यातून उद्भवणार्या परिस्थितीस संबंधित प्रशासन व रेल्वे विभाग जबाबदार राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रस्तावित भूसंपादन प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी व अधिसूचना रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर विजय जाधव, अंकुश टिळे, रवी अस्वले, अमोल जाधव, दत्तू मानकर, शेखर अरिंगळे, दत्तू नागरे आदी बाधित शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI