वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; मदतीच्या मागणीवरून आंदोलन
रायपूर जंगलीत दिवसाढवळ्या हल्ला; ग्रामस्थ आक्रमक, मृतदेह पुन्हा शवागारात वर्धा, १० सप्टेंबर (हिं.स.) : रायपूर जंगली शिवारात बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दिवसाढवळ्या वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.
‘१ कोटींची नुकसान भरपाई द्या, अन्यथा…’; वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यूनंतर गावकरी संतप्त, खासदारांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू


रायपूर जंगलीत दिवसाढवळ्या हल्ला; ग्रामस्थ आक्रमक, मृतदेह पुन्हा शवागारात

वर्धा, १० सप्टेंबर (हिं.स.) : रायपूर जंगली शिवारात बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दिवसाढवळ्या वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. भगवानजी धुर्वे (रा. रायपूर जंगली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भगवानजी धुर्वे हे नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना पांदण रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मानव-वन्यजीव संघर्षामुळे भीतीचे वातावरण

रायपूर जंगली परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत आहेत. यापूर्वी आमगाव जंगली येथील शेतकरी खोब्रागडे यांच्यावरही वाघाने हल्ला करून त्यांचा जीव घेतला होता. तसेच जुलै-ऑगस्ट महिन्यात अस्वलीने एका गुराख्यावर हल्ला केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची दहशत वाढली आहे.भगवानजी धुर्वे यांच्या मृत्यूनंतर गुरुवारी ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी गावात धरणे आंदोलन सुरू केले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावात आणण्यात आला होता. मात्र, ग्रामस्थांचा रोष वाढल्यानंतर मृतदेह पुन्हा शवागारात पाठविण्यात आला.

‘एक कोटींची मदत द्या’

या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी खासदार अमर काळे यांनी संतप्त ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.नोकरी देणे शक्य नसेल, तर किमान एक कोटी रुपयांची मदत देण्यात यावी. त्या रकमेच्या व्याजावर कुटुंबाला उदरनिर्वाह करणे शक्य होईल, अशी भूमिका खासदार काळे यांनी मांडल्याचे सांगण्यात आले.

वन विभागाकडून २५ लाखांची मदत

वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी विद्यमान नियमांमध्ये बसत नाही. नियमानुसार २५ लाख रुपयांची मदत दिली जाते, अशी भूमिका वन विभागाने घेतल्याचे सांगण्यात आले.या भूमिकेवर खासदार अमर काळे यांनी नाराजी व्यक्त केली. वनमंत्र्यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत याबाबत स्पष्ट निर्णय होत नाही, तोपर्यंत मृतदेह शवागारातच ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांकडून घेण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर वन विभागाचे अधिकारी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास सध्या तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे रायपूर जंगलीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande