
पुणे, 10 सप्टेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि जगभरात नावाजलेले तसेच वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सोयी-सुविधा उल्लेखनीय असून, या विकासाला भविष्यातील गरजा आणि वाढते शहरीकरण यांची सांगड घालणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या भविष्यातील विकासाचा वेध घेत, उपलब्ध नागरी सुविधांचा सर्वांगीण विचार करून पिंपरी चिंचवडच्या सूक्ष्म आणि नियोजनबद्ध विकासाचे मॉडेल तयार करण्याचे उद्दिष्ट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी समोर ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने ते निश्चितपणे यशस्वी वाटचाल करतील आणि पिंपरी चिंचवड शहराला विकासाची नवी उंची प्राप्त करून देतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या वतीने करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, लोकमतचे संपादक संजय आवटे, दैनिक पुढारीचे संपादक सुनील माळी, लेट्स अप मराठीचे संपादक योगेश कुटे, सकाळ माध्यम समुहाच्या सहसंपादिका मृणालिनी नानिवडेकर तसेच विविध माध्यम समुहांचे पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितले, बऱ्याच वर्षांनंतर पिंपरी चिंचवड शहरात येण्याची संधी मिळाली. पूर्वी गावाच्या स्वरूपात असलेल्या या परिसराने गेल्या काही दशकांत अत्यंत प्रभावशाली आणि विकसित शहर म्हणून घेतलेली झेप ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण आशियासाठी एक उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशियातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक असून, वेगाने होणारे शहरीकरण अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वत पद्धतीने कसे करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण शहरातून पाहायला मिळते, असे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु