सोलापूर : कुमठ्यात रेल्वे कामाच्या खड्ड्याने घेतला व्यक्तीचा बळी; सुरक्षाव्यवस्थेवर संताप
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)। कुमठे मध्यवस्ती, टिकेकरवाडी परिसरात दुहेरी रेल्वे ट्रॅकच्या सुरू असलेल्या कामादरम्यान खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. काशीम अलाउद्दीन शेख (वय ५०, रा. कुमठे, सध्या घर
Hdjd


सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।

कुमठे मध्यवस्ती, टिकेकरवाडी परिसरात दुहेरी रेल्वे ट्रॅकच्या सुरू असलेल्या कामादरम्यान खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. काशीम अलाउद्दीन शेख (वय ५०, रा. कुमठे, सध्या घरकुल परिसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रस्त्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून काशीम शेख हे काम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या परिसरात सध्या दुहेरी रेल्वे ट्रॅकचे काम सुरू असून, कामाच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. घरांना अगदी लागून मोठमोठे खड्डे खोदण्यात आले असून, रात्रीच्या वेळी याच परिसरातून महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे भविष्यातही अशा दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित ठेकेदाराला तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला.

दरम्यान, खड्ड्यात पडलेल्या काशीम शेख यांना बाहेर काढण्यात आले. विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

काशीम शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे कुमठे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande