
धाराशिव, १० सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मिरवणुका, रॅली आणि शोभायात्रांमध्ये प्लाझमा, बीम लाईट तसेच लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. हा निर्बंध १४ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री गणेशोत्सव साजरा होणार आहे. या कालावधीत विविध पक्ष, संघटना आणि गणेश मंडळांकडून मिरवणुका, रॅली व शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या प्रकाशयंत्रांमधून निघणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या तसेच मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसह वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊन आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच रस्त्यावरील वाहनचालकांच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात किंवा अन्य अनुचित प्रकार घडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यातील सर्व मिरवणुका, रॅली आणि शोभायात्रा शांततेत पार पडाव्यात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३(१) अन्वये नागरिकांच्या जीवितास किंवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका, रॅली आणि शोभायात्रांमध्ये नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करण्यास १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
प्रशासनाने संबंधित पक्ष, संघटना आणि गणेश मंडळांनी या आदेशाचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis