शेतीच्या वादातून मंत्री अतुल सावे यांच्या बंधू आणि पुतण्याला मारहाण
छत्रपती संभाजीनगर, १० सप्टेंबर (हिं.स.) : शेतीच्या बांधावरून आणि रस्त्यावरून होणाऱ्या वादांना अनेकदा गंभीर स्वरूप प्राप्त होते. अशाच प्रकारच्या वादातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या मोठ्या बंधू आणि पुतण्याला मारहाण झाल्याची घटना पैठण ता
शेतीच्या वादातून मंत्री अतुल सावे यांच्या बंधू आणि पुतण्याला मारहाण


छत्रपती संभाजीनगर, १० सप्टेंबर (हिं.स.) : शेतीच्या बांधावरून आणि रस्त्यावरून होणाऱ्या वादांना अनेकदा गंभीर स्वरूप प्राप्त होते. अशाच प्रकारच्या वादातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या मोठ्या बंधू आणि पुतण्याला मारहाण झाल्याची घटना पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

या मारहाणीत अमेय अजित सावे (३५) आणि अजित मोरेश्वर सावे (७०), रा. खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर, हे दोघे जखमी झाले आहेत. शेती आणि रस्त्याच्या वादातून एका गटाने त्यांच्यावर मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे.ही घटना बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मारहाणीनंतर जखमी दोघांना उपचारासाठी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात नेमका वाद कशामुळे झाला आणि मारहाणीत किती जण सहभागी होते, याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.दरम्यान, अतुल सावे हे राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री असून भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेतीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande