अमरावती - तळेगाव ठाकूरमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचे काम महिनाभरापासून रखडले
अमरावती, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सुरू असलेले सांडपाणी व्यवस्थापनाचे काम गेल्या महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने परिसरात घ
तळेगाव ठाकूरमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचे काम महिनाभरापासून रखडले!


अमरावती, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सुरू असलेले सांडपाणी व्यवस्थापनाचे काम गेल्या महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने परिसरात घाण व दुर्गंधी निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. याच परिसरालगत अंगणवाडी असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांना विविध आजारांचा धोका आहे. तसेच या परिसरात फिरणाऱ्या गुरांनाही खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे.या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्ज करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीकडूनही रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, तिवसा यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, कंत्राटदाराशी संपर्क साधला असता साहित्य ठेवण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाल्याने काम थांबविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. येत्या १४ ते १५ सप्टेंबरपासून काम पुन्हा सुरू करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले आहे.अर्धवट कामामुळे निर्माण झालेली अस्वच्छता, दुर्गंधी आणि धोकादायक खड्डे तातडीने दूर करून सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande