
उमरगा, १० सप्टेंबर (हिं.स.) : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा नोंदी असलेल्या पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावे आणि त्यासाठी अनावश्यक धावपळ करावी लागू नये, यासाठी उमरगा तालुक्यात महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ही शिबिरे घेण्यात येणार आहेत.
या शिबिरांमध्ये नागरिकांच्या उपलब्ध महसुली अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधणे, जुन्या अभिलेखांतील पुराव्यांची पडताळणी करणे, अर्ज स्वीकारणे आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे आदी कार्यवाही केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक ती पुढील कार्यवाहीही याच माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
उमरगा तालुक्यातील दाळींब, नारंगवाडी, मुरूम, मुळज, उमरगा, बलसूर आणि बेडगा या महसूल मंडळांच्या कार्यक्षेत्रात संबंधित मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी आणि कृषी सहायक यांच्या समन्वयाने ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
विशेष शिबिरांची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबतची माहिती संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर तसेच दवंडी आणि स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गावातील शिबिराची निश्चित तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती स्थानिक पातळीवरून घ्यावी.
तालुक्यातील ज्या नागरिकांकडे कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा नोंदी अथवा त्यासंबंधीचे पुरावे उपलब्ध आहेत, तसेच ज्यांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांनी संबंधित महसूल मंडळाच्या विशेष शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. उपलब्ध अभिलेख आणि कागदपत्रांची पडताळणी करून पात्र नागरिकांच्या जात प्रमाणपत्रासाठी पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
पात्र नागरिकांना शासनाच्या या उपक्रमाचा लाभ मिळावा आणि जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, उमरगा आणि तहसीलदार, उमरगा यांनी केले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis