
धाराशिव, १० सप्टेंबर (हिं.स.) : सन २०२६-२७ या वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत. यासाठी कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा, प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट या घटकासाठी प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान केवळ यंत्रसामग्री (Plant and Machinery) खरेदी तसेच इमारत, गोदाम व साठवणूक पायाभूत सुविधा उभारणीसाठी लागू राहणार आहे.
हा घटक बँक कर्जाशी निगडित असल्याने अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित अर्जदार, पतसंस्था, कंपनी व संघ या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
शेतकरी उत्पादक संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असल्याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित संस्थांचे मागील दोन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट, ७/१२ व ८-अ उतारे सादर करावे लागतील. वैयक्तिक अर्जदारांनी त्यांच्या नावावरील ७/१२ व ८-अ उतारे सादर करणे आवश्यक आहे.
वैयक्तिक अर्जदाराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील पती, पत्नी व अविवाहित मुले यापैकी केवळ एका व्यक्तीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम आणि कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
या घटकासाठी भौतिक २ चा लक्षांक प्राप्त झाला असून शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, प्राथमिक कृषी पतसंस्था तसेच वैयक्तिक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis