झेलेंस्कींचे विमान ड्रोनच्या धडकेपासून थोडक्यात बचावले; नॉर्वेच्या पंतप्रधानांचा दावा
कीव, 10 सप्टेंबर (हिं.स.)। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांचे विमान मोल्दोव्हाहून नॉर्वेला जात असताना एका अज्ञात ड्रोनच्या धडकेपासून थोडक्यात बचावले. दिवंगत नॉर्वेजियन राजा हेराल्ड पंचम यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी झे
झेलेंस्कींचे विमान ड्रोनच्या धडकेपासून थोडक्यात बचावले; नॉर्वेच्या पंतप्रधानांचा दावा


कीव, 10 सप्टेंबर (हिं.स.)। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांचे विमान मोल्दोव्हाहून नॉर्वेला जात असताना एका अज्ञात ड्रोनच्या धडकेपासून थोडक्यात बचावले. दिवंगत नॉर्वेजियन राजा हेराल्ड पंचम यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी झेलेंस्की ओस्लोला जात होते. त्याचवेळी त्यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी झाल्याचे समोर आले.नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या घटनेला दुजोरा दिला.झेलेंस्की यांच्या दौऱ्यादरम्यान निर्माण झालेल्या सुरक्षा धोक्याची गंभीरता या घटनेतून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

स्टोरे यांनी सांगितले की, मोल्दोव्हाहून उड्डाण करत असताना झेलेंस्की यांचे विमान एका ड्रोनच्या जवळपास धडकेपासून बचावले. “त्यांना ज्या वास्तवाचा सामना करावा लागतो, ते हेच आहे,” असे त्यांनी म्हटले. मात्र, युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेची अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. झेलेंस्की मंगळवारी संध्याकाळी सुरक्षितपणे ओस्लो येथे पोहोचले. मोल्दोव्हाहून रवाना झाल्यानंतर ते राजा हेराल्ड पंचम यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी नॉर्वेत पोहोचले होते. या अंत्यसंस्काराला जगभरातील अनेक नेते आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित होते. त्याआधी झेलेंस्की यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांची भेटही घेतली होती.नॉर्वेच्या पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री भानुजा रसियाह यांनी सांगितले की, मोल्दोव्हाच्या हवाई हद्दीत ड्रोनचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे झेलेंस्की यांच्या ओस्लोला जाणाऱ्या विमानाला उशीर झाला.

नॉर्वेचे अर्थमंत्री जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनीही या घटनेला दुजोरा दिला. ओस्लोला पोहोचल्यानंतर काही वेळातच झेलेंस्की यांनी स्वतः त्यांना या घटनेची माहिती दिली, असे त्यांनी सांगितले.स्टोल्टेनबर्ग म्हणाले, “काल रात्री झालेल्या आमच्या बैठकीत त्यांनी आम्हाला याबद्दल सांगितले. मला या घटनेच्या तपशीलात जाण्याचे धाडस करायचे नाही. मात्र, त्यांच्या विमानाला उशीर झाला होता आणि विमानासंदर्भात काही धोके निर्माण झाले होते. याबाबत अधिक माहिती देण्याइतकी माहिती माझ्याकडे नाही.” ते पुढे म्हणाले की, झेलेंस्की यांना तेथून बाहेर पडताना काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, युक्रेनमधून बाहेर पडणे कधीही सोपे नसते. असे असूनही त्यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक वेळ आणि प्रयत्न केले.

सुरक्षेशी संबंधित धोके असूनही झेलेंस्की यांची अंत्यसंस्कारातील उपस्थिती महत्त्वाची होती, असे स्टोल्टेनबर्ग यांनी सांगितले. वृत्तानुसार, बुधवारी राजा हेराल्ड पंचम यांच्या अंत्यसंस्कारावेळी झेलेंस्की यांना जगातील इतर नेत्यांसोबत चालताना पाहणे प्रभावी दृश्य होते. अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर झेलेंस्की यांनी ‘एक्स’वरून दिवंगत राजा हेराल्ड यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटले की, युक्रेन नॉर्वेकडून मिळालेल्या मदतीसाठी नेहमीच कृतज्ञ राहील. हे सहकार्य केवळ नॉर्वे सरकारकडूनच नव्हे, तर तेथील राजघराणे आणि जनतेकडूनही मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande