
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्यातील २०२६-२७ या वर्षासाठी प्रस्तावित वाळू घाटांना राज्यस्तरीय पर्यावरण समित्यांची मान्यता मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून, उपलब्ध संसाधनांच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल (DSR) भाग एक तयार करण्यात आला आहे.
या अहवालात वाळूसह अन्य गौण खनिजे आणि दगडखाणींचाही भाग दोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
हा जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नागरिकांना वाळू घाटांच्या लिलावासंदर्भात तसेच जिल्ह्यातील दगडखाणींबाबत सूचना आणि अभिप्राय सादर करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आपल्या सूचना खानिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर कराव्यात किंवा miningofficersolapur@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड