
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार सन २०२६ मधील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांच्या आवारात एकाच वेळी ही लोकअदालत होणार आहे.
या लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, बँक वसुली, धनादेश न वटल्याची कलम १३८ अंतर्गत प्रकरणे, मोटार अपघात दावे, कामगार वाद, वीज व पाणी देयकांशी संबंधित प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन प्रकरणे तसेच बँका, सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या वसुलीच्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणेही लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत.
लोकअदालतीस प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पक्षकारांसाठी ऑनलाइन माध्यमातून सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
धनादेश न वटल्याच्या प्रकरणांमध्ये तडजोडीद्वारे रक्कम भरण्याची सुविधा असून, एकरकमी रक्कम देणे शक्य नसल्यास हप्त्यांचीही व्यवस्था करता येणार आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरण निकाली निघाल्यास पक्षकारांना पुढील न्यायालयीन तारखांना उपस्थित राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
न्यायालयीन वाद सामोपचाराने आणि कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक, पक्षकार आणि संस्थांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज एस. शर्मा आणि सचिव अमोलकुमार देशपांडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड