एकीकडे गणेशोत्सवात पथकर सवलत, तर दुसरीकडे खाजगी बस प्रवासी वाऱ्यावर!
* खाजगी ट्रॅव्हल्सची ४०० ते १२०० टक्के बेकायदेशीर भाडेवाढ रोखण्यासाठी ''डिजिटल फेयर लॉक'' आणि ''तक्रार QR कोड'' अनिवार्य करा - सुराज्य अभियान मुंबई, 10 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकणात जाणाऱ्या भाविक
एकीकडे गणेशोत्सवात पथकर सवलत, तर दुसरीकडे खाजगी बस प्रवासी वाऱ्यावर!


* खाजगी ट्रॅव्हल्सची ४०० ते १२०० टक्के बेकायदेशीर भाडेवाढ रोखण्यासाठी 'डिजिटल फेयर लॉक' आणि 'तक्रार QR कोड' अनिवार्य करा - सुराज्य अभियान

मुंबई, 10 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पथकर (टोल) सवलत लागू केली आहे. परंतु, शासनाकडून एकीकडे टोल सवलतीची घोषणा होत असताना, दुसरीकडे मात्र खाजगी बसेसने प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना प्रशासनाने पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सुराज्य अभियानाने यापूर्वीही अनेकदा विविध माध्यमांतून प्रशासनाचे लक्ष वेधून कडक कारवाईची मागणी केली होती; मात्र प्रशासकीय दुर्लक्षामुळे आज ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित व विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या व प्रवासी क्षमता मर्यादित असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना नाईलाजाने खाजगी कंत्राटी बसेसचा पर्याय निवडावा लागत आहे. याच परिस्थितीचा थेट गैरफायदा ऑनलाइन बस तिकीट बुकिंग एपच्या माध्यमातून खाजगी ट्रॅव्हल्स घेत असून ४००% ते १२००% पर्यंत बेकायदेशीर भाडेवाढ करत आहेत. रेड बस तिकीट बुकिंग पोर्टल वर मुंबई, पुणे आणि कोल्हापूरवरून कोकणात जाणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गांवर रु. १,२०० ते रु. ३,९५७ पर्यंतची बेकायदेशीर दरवाढ दिसत आहे :

पुणे ते कणकवली मार्ग: १० सप्टेंबरचे भाडे रु. २,२१७ ते रु. २,५९९ - गणेशोत्सव आगमनाच्या दिवशी (११ सप्टें) ते थेट रु. ३,४०० ते रु. ४,४२१ पर्यंत (रु. १,८०० ची वाढ) वाढवण्यात आले आहे.

मुंबई (सायन) ते सिंधुदुर्ग मार्ग: ९ सप्टेंबरचे मूळ भाडे रु. १,१०० असताना, ११ सप्टेंबर रोजी रु. ४,२७६ आकारले जात आहे (रु. ३,१७६ ची थेट वाढ).

कोल्हापूर ते कांकवली मार्ग: ९ सप्टेंबरचे मूळ भाडे रु. ३६० वरून ११ सप्टेंबरसाठी थेट रु. ४,३१७ प्रति सीट (रु. ३,९५७ ची प्रचंड वाढ) आकारले जात आहे.

मोटार वाहन कायदा (कलम ६७) नुसार खाजगी बसेसचे कमाल भाडे एसटीच्या मूळ भाड्याच्या १.५ पट (५०% अधिक) असणे बंधनकारक असताना ऑनलाइन मात्र अवाढव्य दराने तिकीट विक्री सुरू आहे. यासाठी परिवहन विभागाने कलम ९३ अन्वये ऑनलाईन ॲप्सवर १.५ पट मर्यादेचे 'डिजिटल फेयर लॉक' लावावे, प्रत्येक बसमध्ये सीटच्या मागे 'तक्रार निवारण QR कोड' अनिवार्य करावा तसेच सर्व ऑनलाइन बूकिंग पोर्टलची तपासणीसह आरटीओच्या फ्लाईंग स्क्वॉडद्वारे अचानक तपासणी करून जादा भाडे वसूल करणाऱ्या बसेसचे परवाने तात्काळ निलंबित करावेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande