
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूरसह लगतच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी धरणाच्या साठवण क्षमतेला गाळाचा मोठा फटका बसला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या २०२३ मधील जलसर्वेक्षणानुसार, गाळ साचल्यामुळे धरणाच्या एकूण साठवण क्षमतेत ५४५.०५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १६.४२ टक्के घट झाली आहे.
उजनी धरणाची मूळ अभिकल्पित एकूण साठवण क्षमता ३ हजार ३२० दशलक्ष घनमीटर होती. मात्र, २०२३ मधील सर्वेक्षणानुसार ती घटून २ हजार ७७४.९५ दशलक्ष घनमीटर इतकी राहिली आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रीय जल आयोगाकडे उजनी धरणातील गाळाच्या स्थितीबाबत माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना जलविभाजन व जलाशय अवसादन निदेशालयाचे संचालक शैलेश कुमार यांनी २ सप्टेंबर रोजी ही माहिती दिली.
२०२३ मधील जलसर्वेक्षणानुसार उजनी धरणाची पूर्ण जलाशय पातळी अर्थात एफआरएल ४९६.८३ मीटर असताना अंदाजित एकूण साठवण क्षमता २ हजार ७७४.९५ दशलक्ष घनमीटर आढळली. त्यामुळे गाळ साचल्याने धरणाच्या मूळ क्षमतेपैकी ५४५.०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमता कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड