

* 'रसायनशास्त्राच्या माध्यमातून शाश्वततेचा विकास'
पुणे, 11 सप्टेंबर (हिं.स.) - रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी) द्वारे सीएसआयआर -राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनसीएल) पुणे येथे पहिल्या ‘इंडिया सस्टेनेबिलिटी फोरम (आयएसएफ) २०२६’चे आयोजन करण्यात आले. 'रसायनशास्त्राच्या माध्यमातून शाश्वततेचा विकास' या संकल्पनेवर आधारित या एकदिवसीय परिषदेत भारतातील हवामान बदल, ऊर्जा संक्रमण, चक्राकार अर्थव्यवस्था आणि हरित उत्पादन यांसारख्या आव्हानांवर सखोल चर्चा झाली.
आरएससी इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. व्यंकटेश सर्वसिद्धी यांनी सांगितले, भारताकडे विज्ञानावर आधारित शाश्वत उपायांचे नेतृत्व करण्याची अभूतपूर्व संधी आहे. संशोधनाचे प्रत्यक्ष सामाजिक आणि पर्यावरणीय फायद्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
यजमान संस्थेचे संचालक डॉ. आशिष लेले म्हणाले, शाश्वतता हे केवळ संशोधन नसून जागतिक आणि सामाजिक स्तरावरील अस्तित्वाचे सर्वात मोठे आव्हान आहे. तर एनसीएलचे मुख्य वैज्ञानिक डॉ. बी. एल. व्ही. प्रसाद यांनी, हवामान बदलाला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नसते, असे सांगत जागतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
विकसित भारत २०४७ च्या ध्येयाला गती देण्यासाठी रसायनशास्त्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रयोगशाळेतील संशोधनाचा प्रत्यक्ष उद्योगात आणि समाजात कसा प्रभावी वापर करता येईल, यावर या व्यासपीठावरून भर देण्यात आला. या परिषदेत भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, आयआयटी बॉम्बे, शिव नाडर युनिव्हर्सिटी, पीडिलाइट आणि प्राज इंडस्ट्रीज यांसारख्या नामांकित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान शाश्वत रसायनशास्त्रातील योगदानाबद्दल 'शी लीड्स सस्टेनेबिलिटी' आणि 'इमर्जिंग रिसर्च' पुरस्कारांनी तज्ज्ञांचा गौरव करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी