अमरावती ‘स्मार्ट स्कूल’च्या घोषणांमध्ये ७३ शाळा अद्याप अंधारात
जिल्ह्यातील ३६८ शाळांमध्ये इंटरनेट नाही डिजिटल शिक्षणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह अमरावती, १२ सप्टेंबर (हिं.स.)। ‘स्मार्ट स्कूल’, डिजिटल शिक्षण, कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि ऑनलाइन अध्यापनाच्या घोषणा जोरात सुरू असताना अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदे
३६८ शाळांत डिजिटल शिक्षणाचा पाया ढासळला, अमरावतीच्या ७३ शाळांमध्ये अंधार


जिल्ह्यातील ३६८ शाळांमध्ये इंटरनेट नाही डिजिटल शिक्षणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

अमरावती, १२ सप्टेंबर (हिं.स.)। ‘स्मार्ट स्कूल’, डिजिटल शिक्षण, कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि ऑनलाइन अध्यापनाच्या घोषणा जोरात सुरू असताना अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अद्याप वीज आणि इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ७३ शाळांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही, तर तब्बल ३६८ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे डिजिटल शिक्षणाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अमरावतीत जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७१ शाळांमध्ये सुमारे १ लाख ३७ हजार ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या अध्यापनासाठी पाच हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. एवढी मोठी शिक्षण व्यवस्था असतानाही अनेक शाळांमध्ये वीज, इंटरनेट, कार्यरत संगणक, दिव्यांगस्नेही सुविधा, स्वच्छतागृहे आणि खेळाचे मैदान यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

मेळघाटच्या शाळांची स्थिती गंभीर

जिल्ह्यातील १ हजार ५७१ शाळांपैकी १ हजार २०३ शाळांमध्ये वीज सुविधा कार्यरत आहे. मात्र, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांमध्ये वीज सुविधेची स्थिती तुलनेने चांगली असली, तरी मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांतील ४४ शाळा अद्याप वीज जोडणीपासून वंचित आहेत. याशिवाय अन्य नऊ तालुक्यांतील २९ शाळांमध्येही वीज जोडणी कार्यरत नाही.अनेक शाळांमध्ये संगणक, स्मार्ट बोर्ड किंवा डिजिटल साधने उपलब्ध असली तरी वीज आणि इंटरनेटच्या अभावामुळे त्यांचा प्रत्यक्ष वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे डिजिटल शिक्षणाचा पाया अनेक ठिकाणी अद्याप कमकुवत असल्याचे चित्र आहे.

पिण्याचे पाणी, शौचालयांचीही वानवा

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी आणि वापरण्यायोग्य शौचालयांची सुविधा उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. त्याचबरोबर अनेक शाळांतील वर्गखोल्या जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन आणि नळजोडणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून ही कामे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हाती घेतली आहेत.

भौतिक सुविधांना आता प्राधान्य

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भौतिक सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी जि.प. सेस फंड आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीतून प्रत्येक शाळेत शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी तसेच वीज जोडणी यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.याशिवाय ग्रामपंचायतींच्या गावविकास आराखड्यात शाळांमधील आवश्यक सोयी-सुविधांचा समावेश करून त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.

तालुकानिहाय वीज व इंटरनेटची स्थिती

तालुका इंटरनेट नाही वीज नाही

अचलपूर २० १

अमरावती १३ ३

अंजनगाव ७ ०

भातकुली २० ६

चांदूर बाजार ३४ ९

चांदूर रेल्वे ३ ०

चिखलदरा ८६ २५

दर्यापूर २२ ५

धामणगाव २० १

धारणी ९६ १९

मोर्शी २५ २

नांदगाव खंडेश्वर १५ १

तिवसा ३ ०

वरूड ४ ९

-------------------------------------------

तालुकानिहाय आकडेवारीत धारणीमध्ये सर्वाधिक ९६, तर चिखलदऱ्यात ८६ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे चिखलदरा आणि धारणी मिळून ४४ शाळा अद्याप वीज सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे ‘स्मार्ट स्कूल’ आणि डिजिटल शिक्षणाच्या घोषणा प्रत्यक्षात आणण्यापूर्वी जिल्ह्यातील शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande