शिरजगावात वाघाच्या हल्ल्यामुळे  पोळा उत्सव  रद्द
अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.)। वाघाच्या भीषण हल्ल्यात गावातील दिनेश आवारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे पोळा उत्सव रद्द करून बक्षीसातील साहित्य आवारे कुटुंबांना भेट देण्यात आली. शिरजगाव कसबातील नागरिकांनी दाखविलेल्या आपल्
शिरजगावात सामाजिक बांधिलकीचे दर्शन


अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.)। वाघाच्या भीषण हल्ल्यात गावातील दिनेश आवारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे पोळा उत्सव रद्द करून बक्षीसातील साहित्य आवारे कुटुंबांना भेट देण्यात आली. शिरजगाव कसबातील नागरिकांनी दाखविलेल्या आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन चर्चेचा विषय झाला आहे.

संकटसमयी संपूर्ण गाव मृतकाच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले असून, गावातून सामाजिक बांधिलकीचे एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद उदाहरण समोर आले आहे. शासनाकडून तातडीची मदत आणि नोकरीची हमी मिळाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित पावले उचलली आहेत. पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली असून, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची लेखी हमी देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबाला या कठीण काळात मोठा आधार मिळाला आहे. पत्रकार सहकारी पतसंस्था, विदर्भ शेतकरी कंपनी व कार्तिक मंदिराच्या वतीने शिरजगावात दरवर्षी पोळा उत्सव साजरा करण्यात येत असतो. यामध्ये सुदृढ व सजावट बैलजोडींना बक्षीसाचे वितरण करण्यात येते. परंतु गावात ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे यंदाचा पोळा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय पोळा उत्सव समिती आणि गावकऱ्यांनी एकमुखाने घेतला.

दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या पोळा सणाचा मुख्य जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आला. उत्सवाचा खर्च पीडित कुटुंबाला साहित्याची भेट देऊन करण्यात आला. सण-उत्सव पुन्हा येतील, पण आपला माणूस गमावलेल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, अशी भावना पोळा समितीच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. दुःखद प्रसंगी संपूर्ण गाव एक कुटुंब म्हणून कसे पाठीशी उभे आहे, याचेच हे जिवंत उदाहरण आहे. गावकऱ्यांनी दाखवलेल्या या अभूतपूर्व एकतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande