
तब्बल १५ कारागीरांची २० दिवसांपासून अहोरात्र मेहनत
यवतमाळ, १२ सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या काही वर्षांत ‘निखीलनगरचा राजा’ या नावाने प्रसिद्धीस आलेल्या बालगणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही गणेशभक्तांसाठी आकर्षक देखावा साकारला आहे. विविध साहित्याचा वापर करून ‘डमरू महल’ उभारण्यात येत असून, एकमेकांच्या शेजारी भव्य डमरू उभारून त्यापासून महलाची निर्मिती करण्यात येत आहे.
यवतमाळ शहरातील टेकडीसदृश भागात असलेल्या निखीलनगर परिसरात गेल्या १८ वर्षांपासून बालगणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. यंदा मंडळाने हटके संकल्पना राबवत डमरू महल साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बांबू, बॉटम, रिंग, दोरी, कापड आणि विविध रंगांसह अन्य साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
भव्य डमरू तयार करून त्यांची आकर्षक रचना करण्यात येत असून, त्यापासून महलाचा देखावा साकारला जात आहे. हा देखावा पूर्ण करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांसोबतच १५ कारागीर गेल्या २० दिवसांपासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटीचीही तयारी सुरू आहे.
यंदाच्या गणेशोत्सवातील या अनोख्या देखाव्याचा प्रथम दर्शन सोहळा रविवार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. ‘डमरू महल’ पाहण्यासाठी गणेशभक्त आणि नागरिकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
उत्सव यशस्वी आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष ऋषी धुर्वे, सचिव प्रज्वल बढाये, उपाध्यक्ष शुभम चव्हाण, कोषाध्यक्ष मयूर कोठेकर तसेच सदस्य शुभम राऊत, देवांशु देशमुख, साई ठाकरे आणि नितीक बाळबुधे परिश्रम घेत आहेत.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी