अमरावतीत गणेशोत्सवासाठी ग्रामीण पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
हजार ४१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई १,५०९ सार्वजनिक गणेश मंडळांवर पोलिसांची नजर अमरावती, १२ सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवादरम्यान कायदा-सुव
गणेशोत्सवाआधीच गुन्हेगारांवर कडक ‘वॉच’


हजार ४१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

१,५०९ सार्वजनिक गणेश मंडळांवर पोलिसांची नजर

अमरावती, १२ सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांवर करडी नजर ठेवण्यात येत असून, विविध कायद्यांन्वये तब्बल ३ हजार ४१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात यंदा तब्बल १ हजार ५०९ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या कालावधीत सुमारे २ हजार पोलिस अधिकारी, अंमलदार आणि गृहरक्षक दलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

गणेश विसर्जन मार्गांवर विशेष बंदोबस्त

गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जनाच्या मार्गांवर वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांसह गर्दीच्या ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणेश मंडळांना त्यांच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सवादरम्यान गर्दीवर आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारेही निगराणी केली जाणार आहे.

९४८ जणांवर प्रतिबंधात्मक आदेशाची प्रक्रिया

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ९४८ जणांवर बीएनएसएस कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये सात जणांना तडीपार करण्यात आले आहे.तसेच, कलम ५५ अन्वये एका टोळीला हद्दपार करण्यात आले असून, एमपीडीए कायद्यान्वये दोन जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या व्यापक प्रतिबंधात्मक कारवाईमुळे समाजकंटकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande