
ऑनलाइन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल
नाशिक, १२ सप्टेंबर (हिं.स.)। संपूर्ण देशात आगामी काळात ऑनलाइन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल आणखी वाढणार आहे. महाराष्ट्रातही नाशिकसह पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळत असल्याचे ‘कॉलेज विद्या’चे सहसंस्थापक रोहित गुप्ता यांनी सांगितले.
नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात गुप्ता यांनी ‘कॉलेज विद्या’मार्फत करण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या सर्वेक्षणाची आकडेवारी सादर केली. महाराष्ट्रातील ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांच्या एकूण नोंदणीमध्ये नाशिकचा ६.९० टक्के, मुंबईचा १९.५२ टक्के, तर पुण्याचा १३.२० टक्के वाटा असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुप्ता म्हणाले की, ऑनलाइन पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०२१ मध्ये सुमारे ३५ हजार असलेली ही संख्या आता १३.५ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे आगामी काळ ऑनलाइन पदवी शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड करताना योग्य माहिती घेऊन आणि जागरूकतेने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
२१ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले
सर्वेक्षणानुसार, २०२३-२४ मध्ये महाराष्ट्रातील ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांच्या एकूण नोंदणीमध्ये २१ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ४०.७४ टक्के होते. हे प्रमाण २०२५-२६ मध्ये वाढून ५७.१४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
एकूण विद्यार्थ्यांपैकी ७४.२४ टक्के विद्यार्थी २६ वर्षांखालील आहेत. त्याचवेळी ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण दहापैकी एक इतके असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
ऑनलाइन शिक्षणात महिलांचा सहभाग कमी
महाराष्ट्रातील ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांच्या नोंदणीमध्ये महिलांचे प्रमाण अद्याप एक-चतुर्थांशपेक्षा कमी आहे. २०२५-२६ मध्ये एकूण नोंदणीपैकी २४.१० टक्के महिला, तर ७५.९० टक्के पुरुष असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.
ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना ठिकाण आणि नियमित कॅम्पस उपस्थितीच्या बाबतीत अधिक लवचिकता मिळते. मात्र, ऑनलाइन शिक्षणातील नोंदणीमध्ये पुरुष आणि महिलांच्या सहभागात अद्याप मोठी तफावत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.------------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI