
विद्युत शाखेतील उपविभागीय अभियंत्यासह तिघांवर कारवाई
काटकर समितीच्या अहवालानंतर प्रशासनाची पावले
अमरावती, १२ सप्टेंबर (हिं.स.)। डफरीन रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या भीषण अग्निकांड प्रकरणात प्रशासनाने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेतील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले अमरावती दौऱ्यावर असतानाच ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एका उपविभागीय अभियंत्यासह सहायक अभियंता वर्ग-२ आणि एका वर्ग-३ कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नेमके कोणते आरोप ठेवण्यात आले आहेत, हे अधिकृत लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
विद्युत व्यवस्थेवरील दुर्लक्षाचा ठपका
डफरीन रुग्णालयातील अग्निकांडानंतर आरोग्य विभागातील दोषींवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, रुग्णालयातील विद्युत व्यवस्था आणि अग्निसुरक्षा यंत्रणांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधितांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता विद्युत शाखेतील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, डफरीन अग्निकांडाची चौकशी करण्यासाठी नियुक्त काटकर समितीने रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून ७ सप्टेंबर रोजी शासनाला सविस्तर अहवाल सादर केला होता. या अहवालात रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, उपकरणांची नियमित देखभाल आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
एओव्ही आणि शिल्लर कंपनीचाही उल्लेख
काटकर समितीच्या अहवालात रुग्णालयातील विद्युत उपकरणांची देखभाल करणाऱ्या एओव्ही कंपनी तसेच व्हेंटिलेटर उत्पादक शिल्लर कंपनीच्या भूमिकेचाही उल्लेख करण्यात आला आहे. दुर्घटनेच्या कारणांमध्ये या बाबींचा सहभाग असल्याचे समितीने नमूद केल्याची माहिती आहे.
समितीच्या शिफारशींच्या आधारे आरोग्य विभागातील पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागातील आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने डफरीन अग्निकांडातील जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, उपकरणांची देखभाल आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत नेमकी कोणाची जबाबदारी होती
---------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी