भोंदूबाबाने लांबविले वृद्ध महिलेचे तीन तोळ्यांचे दागिने
Three tolas worth of jewellery of an old woman taken away
भोंदूबाबाने लांबविले वृद्ध महिलेचे तीन तोळ्यांचे दागिने


नाशिक, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

: बाबा असल्याची बतावणी करीत वृद्धेला बोलण्यात गुंतवीत तिचे तीन तोळ्यांचे दागिने फसवणूक करून लांबविल्याची घटना देवळाली गाव परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की श्रीमती अनिता अनिल मोरे (वय ६८, रा. देवळाली गाव) या सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी पायी निघाल्या. देवळाली गावाकडून बिटको चौकाकडे त्या जात असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एका इसमाने आपण बाबा असल्याचे सांगत त्यांना बोलण्यात गुंतविले. या भोंदूबाबाने स्वतः जवळील पाचशे रुपयांच्या काही नोटा मोरे यांच्या हातात ठेवून त्यांच्यावर फुंकर मारली. दुसऱ्या इसमाने हातचलाखीने मोरे यांच्या हातातील नोटा स्वतःच्या खिशात ठेवल्या. या भोंदूबाबाने नंतर मोरे यांना सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवण्यास सांगत ती पर्स हातचलाखीने घेऊन ते पसार झाले. या पर्समध्ये २१ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, चार ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची वेलजोडी व ३ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफूल जोडी असे दागिने ठेवलेले होते. या प्रकरणी मोरे यांच्या फिर्यादीवरून भोंदूबाबा व त्याच्या साथीदाराविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande