
अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात चार नागरिकांचा थरारक बळी घेणाऱ्या आणि वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या नरभक्षक वाघिणीचा मृत्यू नेमका कसा झाला, यावरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. वाघिणीचा मृत्यू हा हृदय आणि श्वासोच्छवास बंद पडल्यामुळेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. अमरावती वनविभागाने या शवविच्छेदन अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष प्रसिद्धीपत्रकाद्वारे शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर केले आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत परतवाडा येथील ट्रॅन्सिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने या वाघिणीचे शवविच्छेदन केले. या अहवालानुसार, वाघिणीचा मृत्यू अचानक हृदय व श्वासोच्छवास बंद पडल्याने झाला. याशिवाय, वाघिणीच्या डोक्याच्या मागील भागावर मार लागल्याची खूण आढळली असून, तिच्या मेंदूत रक्तस्राव आणि सूज निर्माण झाली होती. तसेच तिच्या पोटात पट्टकृमींचा अत्यंत गंभीर प्रादुर्भाव होता आणि शरीरावर मोठ्या प्रमाणात गोचड्या आढळून आल्या होत्या, ज्यामुळे ती आधीच आजारी व अशक्त असावी.
अधिक तपासासाठी 'हे' जैविक नमुने प्रयोगशाळेत रवाना
वाघिणीच्या मृत्यूचे वैद्यकीय व अचूक सूक्ष्म वैज्ञानिक कारण शोधण्यासाठी तिचे विविध अवयव आणि जैविक नमुने देशातील नामांकित प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत.
नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय: हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचणीसाठी.
डब्ल्यूआरटीसी, गोरेवाडा: मॉलिक्युलर चाचणीसाठी.
फॉरेन्सिक सायन्स लॅब, अमरावती: विषशास्त्र चाचणीसाठी.
दहशतीचा अंत, पण प्रवासादरम्यानच सोडले प्राण
या नरभक्षक वाघिणीने वर्धा व अमरावती जिल्ह्यात मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घालत ४ नागरिकांचा बळी घेतला होता, तर अनेक पशुधनावर हल्ले केले होते. त्यामुळे तिला पकडण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवून ७ सप्टेंबर रोजी शिरजगाव परिसरातून जेरबंद करण्यात आले होते. मात्र, जेरबंद केल्यानंतर नागपूरच्या गोरेवाडा केंद्रात हलवत असताना मोर्शीजवळ तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि उपचारादरम्यान सायंकाळी ७:३० वाजता तिची प्राणज्योत मालवली.
प्रयोगशाळेचे अंतिम आणि पूर्ण अहवाल येईपर्यंत नागरिकांनी तसेच माध्यमांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा बिनबुडाच्या निष्कर्षांवर विश्वास ठेवू नये. वाघीण प्रकरणातील वास्तव समोर आणले जाईल.
- अर्जुना के.आर. उपवनसंरक्षक, अमरावती वन विभाग (प्रादेशिक)
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी